
मध्य प्रदेशातील छत्तरपूर जंगलात पन्ना येथील हिरा खाणीपेक्षा अधिक म्हणजेच देशातील सर्वात मोठा हिऱ्यांचा साठा मिळण्याचा अंदाज भूगर्भ संशोधकांनी व्यक्त केला आहे. या जंगलात 3.42 कोटी कॅरेटचे किमती हिरे जमीन खोदल्यानंतर मिळतील असा अंदाज आहे. पण त्यासाठी 2 लाख 15 हजार बहुमूल्य झाडांची कत्तल करावी लागणार आहे. मध्य प्रदेशातील पन्ना हिरेखाणीत 22 लाख पॅरेटचे हिरे आहेत असा अंदाज आहे. पण छत्तरपूरच्या बकस्वाहा जंगलात त्याच्या 15 पट अधिक हिरे मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी हा जंगल पट्टा एमपी सरकारने आदित्य बिर्ला उद्योग समूहाच्या एस्सेल मायनिंग कंपनीला 50 वर्षांच्या भाडेपट्टय़ावर दिला आहे. ही कंपनी आता जंगलातील झाडे तोडून तेथे हिऱ्यांसाठी जमिनीचे उत्खनन करणार आहे. त्यासाठी कंपनी 2500 कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र या उत्खननांत बळी गेलेल्या झाडांच्या भरपाईसाठी कंपनी बकस्वाहा तालुक्यातील अन्य जागेवर नवे जंगल विकसित करणार आहे.
























































