Lok Sabha Election 2024 : उमेदवार ठरला नाही, पण छत्रपती संभाजीनगरात महायुतीचा मंडप सजला

समाजातील ढोंग आणि दंभावर कठोर प्रहार करणारे शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे ‘आली आली हो भागाबाई’ हे भारूड अतिशय प्रसिद्ध आहे. या भारूडातील ‘भागाबाई बोलली हटून, लग्नाला बसली नटून, तिच्या नवर्‍याचा पत्त्याच नाही!’ या ओळी आज छत्रपती संभाजीनगरकरांना आठवल्या! भाजप, मिंधे, अजित पवार गट, रिपाइं आठवले गट असे सगळे वर्‍हाडी जमले. मंडपही सजला, पण उमेदवाराचा पत्ताच नव्हता! उमेदवारीचा घोळ कायम असतानाही महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी घाईघाईने प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन उरकून घेतले.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारीचा मुहूर्त समीप येऊन ठेपला असला तरी भाजप आणि मिंध्यांमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेली चढाओढ संपायला तयार नाही. भाजपने केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्यावर डाव लावून पाहिला. पण सर्वेक्षणात त्यांच्या नावावर फुली बसली. त्यानंतर अपक्ष म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या नावाची द्वाही फिरवण्यात आली. पण त्यावरही नापसंतीची मोहोर उमटली. भाजपची दमछाक झाल्यानंतर मिंध्यांनी दंड थोपटले. पैठणचे ‘उजूकराव’ यांचा पत्ता फेकण्यात आला. परंतु ‘दारू’वाला नको म्हणून त्यांचा पत्ताही कट झाला. मिंध्यांच्या जिल्हाप्रमुखांनी मुंडावळ्या बांधल्या, सोशल मीडियात त्यांचे नावही झळकले आणि गायबही झाले.

भाजप, मिंधे, अजित पवार गट, रिपाइं आठवले गट, मनसे एवढे सगळे मध्यस्थ असतानाही पसंतीचा उमेदवार सापडत नसल्याने महायुतीच्या मंडपात ‘वर्‍हाडी बक्कळ अन् नवर्‍यासाठी पळापळ’ असे चित्र बघायला मिळत आहे. उमेदवारच ठरलेला नसताना आज महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे स्तंभपुजन उरकून घेण्यात आले. तापडिया-कासलीवाल मैदानावर हे कार्यालय थाटण्यात येणार आहे.

मिंध्यांचा मोदीचालिसा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे म्हणत गद्दारी करणार्‍या पैठणच्या ‘ईकासपुरुषा’ला भाषण करताना मात्र शिवसेनाप्रमुखांचा विसर पडला. लोकसभेच्या उमेदवारीसाठी रांगेत असलेले संदिपान भुमरे यांनी चक्क ‘मोदीचालिसा’ म्हटला!