
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून जाहीर माघार घेतली त्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी मात्र संभाजीराजेंच्या माघारीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. संभाजीराजेंनी अपक्ष लढावे असा फडणवीसांचा डाव होता, असा खळबळजनक गौप्यस्पह्ट शाहू महाराज यांनी केला आहे.
भाजपला हवे होते बहुजन मतांचे विभाजन
‘संभाजीराजे यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीमध्ये विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली होती. संभाजीराजेंना अपक्ष लढण्यासाठी फडणवीस आणि भाजपाने भाग पाडले होते. बहुजन मतांचे विभाजन व्हावे यासाठी भाजपाची ती राजकीय खेळी होती,’ असा आरोप शाहू महाराज यांनी केला.
मी सत्य तेच बोललो!
संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही,’ असे संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला, असे म्हणणे योग्य नाही
संभाजीराजे यांना उमेदवारी न देऊन शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला, अशी बोंब विरोधकांनी उठवली आहे. त्यालाही शाहू महाराज यांनी उत्तर दिले आहे. ‘आतापर्यंत सर्वांनीच छत्रपती घराण्याचा सन्मान केला आहे. शिवसेनेने उमेदवारी दिली नाही म्हणून छत्रपती घराण्याचा अपमान झाला असे म्हणता येणार नाही. संभाजीराजे यांनी जी राजकीय पावले उचलली तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्यासाठी त्यांनी कधी आमच्याशी किंवा घरच्यांशी चर्चा केली नाही. त्यामुळे इथे छत्रपती घराणे येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला, असे म्हणणेही योग्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात झालेला ठराव हा कच्चा होता,’ असे शाहू महाराज म्हणाले.

























































