मुख्यमंत्र्यांनी घेतली डीएसके प्रकरणाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणात डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना अटक झाली. त्यानंतर आता बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांसह उच्चपदस्थ अधिकारीही अटक झाल्याने या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन तपासाचा आढावा घेतला. पुणे दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीएसके प्रकरणाचा आढावा घेतला. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांना अटक झाल्याने त्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक नित्यानंद सदाशिव देशपांडे यांना विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने देशपांडे यांना अहमदाबाद येथून अटक केली. त्यांना ट्रान्झिट रिमांडद्वारे गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी अध्यक्ष सुशील मुहनोत, डीएसके यांचे चार्टर्ड अकाऊंटंट सुनील घाटपांडे, डीएसके ग्रुपचे इंजिनिअरिंग विभागाचे उपाध्यक्ष राजीव नेवसेकर यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. देशपांडे यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांनाही २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तर, माजी अध्यक्ष मुहनोत यांना जयपूर येथून रात्री पुण्यात आणले आहे, त्यांना शुक्रवारी सकाळी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मराठे रुग्णालयातून पुन्हा पोलीस कोठडीत

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास रक्तदाबाचा आणि हृदयविकाराचा त्रास जाणवत असल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गुरुवारी संपूर्ण दिवसभर डॉक्टरांनी त्यांच्या विविध तपासण्या केल्या. त्यामध्ये मराठे यांची प्रकृती उत्तम असल्याचा अहवाल आहे. दिवसभर निरीक्षक केल्यानंतर त्यांना सायंकाळी पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे सहायक आयुक्त नीलेश मोरे यांनी सांगितले.