
सामना प्रतिनिधी, पालघर
पालघरमध्ये एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक जलवाहिनीचे सुरू असलेले काम हालोली येथे संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एमएमआरडीए, वन विभाग आणि प्रकल्पबाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडवा आणि नंतरच जलवाहिनीचे काम सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बुधवारी बैठकीचे आयोजन केलेले असताना एमएमआरडीएने अगोदरच पोलीस बंदबस्तामध्ये कामाला सुरुवात केली होती. यावेळी हालोली बोट ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच समृद्धी सांबरे, उपसरपंच अजय पाटील, आदिवासी पुनर्वसन आंदोलन समितीचे अविनाश पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. आंदोलकांनी काम बंद पाडून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.





























































