दिल्लीत मनोज तिवारी यांना आपच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवी दिल्लीत एका पूलाच्या उद्घाटनासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी पोहचले होते. या कार्यक्रमादरम्यान भाजपचे कार्यकर्ते आणि आपचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. यावेळी तिवारी यांना आपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून हस्तक्षेप केल्याने अनुचित घटना टळली आहे. आपण उत्तर दिल्ली क्षेत्रातले खासदार आहोत. या पूलाच्या उद्घाटनासाठी आल्यावर आपच्या कार्यकर्त्यांना काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी केला. आपचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे.

‘आपण या क्षेत्रातील खासदार आहे. मी काही गुन्हेगार नाही. पोलिसांनी आपल्याला घेराव का घातला? आपल्याला या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसारच आपण येथे आलो होतो. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी थांबलो असताना अचानक आपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला करून धक्काबुक्की केल्याचे तिवारी यांनी सांगितले. एका खासदाराशी असे गैरवर्तन करणे पोलीस आणि आपच्या कार्यकर्त्यांना शोभते काय असा सवाल करत त्यांनी आपचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्या वर्तनाचा निषेध केला आहे.

‘या कार्यक्रमासाठी अनेकजण निमंत्रणाशिवायच आले होते. मनोज तिवारी स्वतः व्हीआयपी असल्यासारखे वावरत होते. ते स्वतःकडे जनतेचे लक्ष वेधून घेत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी करत आपच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात अनेकजण जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपच्या दादागिरीला आमच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याने तणाव निर्माण झाला’, असे आपच्या दिलीप पांडे यांनी सांगितले.