
सामना प्रतिनिधी । शिरोळ
शेतकऱ्यांच्या उसाची बिले व एफआरपीची रक्कम अद्यापही खात्यावर जमा न केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील नगरपालिका चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये वादावादी झाली.
बुधवारी दुपारी 4.30 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य आण्णासाहेब चौगुले, युवा आघाडीचे अध्यक्ष राघू नाईक,विश्वास बालीघाटे यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड येथील बाजारपेठेतून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुतळ्याची धिंड काढून पालिका चौकात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळ्यावरील फडणवीस यांची प्रतिमा असणारे पोस्टर काढून घेतले.
यावेळी बोलताना आण्णासाहेब चौगुले म्हणाले साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने झाले. शेतकऱ्यांच्या खात्यावर कारखानदारांनी एक पै ही जमा केलेली नाही. साखर कारखानदार व सरकार संगनमत करून शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. शेतकऱ्यांच्या एफआरपीप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी घेतलेले झोपेचे सोंग सोडावे अन्यथा मुख्यमंत्र्यांची नौका शेतकरी बुडवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. यावेळी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























































