निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा! मास्क वापरा-लसीकरण करून घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. दीड महिन्यात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. पुढील पंधरा दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येवर राज्य सरकारचे लक्ष राहील. आता पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी कोविड टास्क पर्ह्स समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले.

कोविड वाढण्याची भीती

गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोविड चाचण्या वाढवा

कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरिएंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे यावर लक्ष ठेवा, असेही त्यांनी सांगितले.

कोविड टास्क पर्ह्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने व्हीसीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

प्रारंभी डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली. 16 एप्रिल 2022 रोजी राज्यात सर्वात कमी 626 सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या 4 हजार 500 वर गेली आहे असे सांगून डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत.

या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम पुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशीष कुमार सिंह उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

-ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करून घ्या.
-गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा.
-12 ते 18 वयोगटातील लसीकरण वाढवा.
-ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी.
-आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करून ठेवावी.
-ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करून ठेवावा.
-पावसाळय़ात जलजन्य आजारदेखील डोके वर काढतात. त्यांची लक्षणे कोरोनासारखीच असल्याने डॉक्टरांनीदेखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.

फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा

कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहेत का ते पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.