
मराठवाडा हा जिद्दी, हिकमती आहे. स्वातंत्र्य लढयात हिरारिने सहभागी झाले ते केवळ स्वातंत्र्य मिळविण्यासाठी नव्हे तर त्या स्वातंत्र्यात एक मोकळा श्वास घेता आला पाहिजे, माझे कुटुंब सुख, समाधान, आनंदात राहिले पाहिजे. त्याकरिता एक शपथ घ्यायला पाहिजे, माझा मराठवाडा कोरोना मुक्त करेन, तसेच आम्ही सर्वजण अशी शपथ घेतो की, तुम्ही जी ताकद आम्हाला दिली, या ताकदीचा पुरेपूर वापर मराठवाडयाची सुख, समृध्दीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वापरेन. हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद तुम्ही आम्हाला द्यावी. असे आवाहन करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजीनगरसाठी विकास प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा केली.
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त संभाजीनगर येथील सिध्दार्थ उद्यानात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे सहभागी झाले होते. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हुतात्मा झालेल्या थोर स्वातंत्र्यवीरांना श्रध्दांजली अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण होताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनानिमित्त मराठवाडयातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मराठवाडा मुक्त झाला तेव्हा तिरंगा फडकला असेल तो रोमांचकारी क्षण, त्या भावना आजही ताज्या आहेत. आजच्या दिनाच्या शुभेच्छा देताना माझ्या समवेत म्हणजे मी इथे आणि आपण सर्वजण तिथे आहात. तरी देखील मी भावनेने, मनाने आणि हृदयाने मी आपल्या सोबत आहे. तो क्षण, त्या क्षणाचे रोमांच, तो उत्साह, ती भावना या ताज्या करणारा हा आजचा दिवस आहे. मराठवाडा ही संताची भुमी म्हणून ओळखली जाते. पण हाच मराठवाडा ज्यावेळेला अन्याय होतो तेव्हा कसा पेटून उठतो, त्याचे हे प्रतिक हा आजचा दिवस आहे. संत, संताची शिकवण आहेच. पण त्याच बरोबरीने अन्यायाविरुध्द लढण, नुसतं लढणार नाही तर अन्याय मोडून तोडून टाकणार आणि स्वातंत्र्य मिळवणार ही आपल्या भुमीची आणि मातेची खासीयत, वैशिष्ट्य आहे.
आजच्या दिनाच्या निमित्ताने मानवदंना, अभिवादन नुसता विचार जरी केला तरी देखील स्वामी रामानंद, गोविंदभाई व त्याचे सर्व सहकारी नावे तरी किती घ्यायची… लहान कोवळयापासून जेष्ठापर्यंत, महिला पर्यंत, काही दाम्पत्याचे दाम्पत्य या लढयात सहभागी झाले होते. अगदी प्रत्येकजण आपआपल्या परीने जिवाची पर्वा न करता रजाकारी मोडून तोडून टाकण्यासाठी या लढयात सहभागी झाले होते. अशा ज्ञात अज्ञात विरांना, शुरांना मी मनापासून अभिवादन करतोय. मानवंदना देतोय. केवळ आपण होतात म्हणून आजचा हा दिवस आम्ही पाहू शकतो आहोत. म्हणून एक कृतज्ञेची भावना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली.
मराठवाडयाशी शिवसेनाप्रमुखांचे भावनिक नाते
मुख्यमंत्री म्हणाले, आजची मराठवाडयाची पिढी ते त्यांचे वारसदार आहे. तोच वारसा घेवून एक सांस्कृतीचा वारसा, शौर्याचा वारसा स्वातंत्र्याचा वारसा, लढयाचा वारसा, अन्याय अत्याचाराविरुध्द लढयाचा वारसा घेवून आपण हा मराठवाडा जपायचा आहे. आज मी येथे मी मुंबईत आहे. तुम्ही तिथे आहेत. हे अंतर भौगोलिक दृष्टया जरी खूप असले तरी देखील मी याच ठिकाणी आहे जिथे मराठवाडयावरती आणि आपल्या संभाजीनगरवरती अतोनात प्रेम करणारे शिवसेनाप्रमुख त्यांचे वास्तव्य होते. हेच आपले वेगळ नाते आहे, ऋणांनुबंध आहे. मैलामध्ये हे अंतर म्हणजे किलोमिटरमध्ये अंतर हे नाते नाही मोजता येणार. एक भावनात्मक हे नाते असे निर्माण झालं, ही जवळीक अशी जवळीक क्वचितच निर्माण होते. अशी जवळीक निर्माण झाली आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दालन निर्माण केले
आज आपण जिथे आहात तिथे काही वर्षापूर्वी आपल्या बाजूलाच मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे एक दालन हे आपण निर्माण केले. जसजशा पिढया पुढे सरकतील तस तसा हा इतिहास म्हणा, लढा म्हणा हा कदाचित हळू हळू विस्मृतीच्या पडदयाआड जावू शकतो. पण तो जाऊ दयायचा नाही. हे आपले काम आहे, आपले कर्तव्य आहे. आपण त्या सगळया शुरविरांचे वारसदार आहोत. त्यांनी आपल्यासाठी हे सगळ भोगले. जुलुम अत्याचार सहन केला, प्रसंगी बलीदान केले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानात हा मराठवाडा सहभागी झाला. हा इतिहास पुढच्या पुढील सांगावा त्याची जाणिव करुन देण हे आपल काम आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
स्वातंत्र्याचा मोकळा श्वास, तोंडावरती मास्क
आज आपण स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत असलो तरी एक वेगळी लढाई आपण लढतो आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा मोकळा श्वास अन् दुसरीकडे आपल्या तोंडावर मास्क. आपलं हे विषाणू बरोबरच दुसरं युध्द आहे. त्याच्याबरोबर आपण लढायच काही काळ हे मास्क आपल्याला ठेवावे लागणार आहे. तुमच्या सोबत राहायची खूप तीव्र इच्छा असतानाही येवू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठवाडा कोरोनामुक्त लढाईत सहभागी व्हा
माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम जाहिर केली. ज्याप्रमाणे मराठवाडा रजाकारांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी सर्वजण लढाईत उतरले त्या प्रमाणे मराठवाडयातील व संभाजीनगरच्या नागरिकांनी कोरोनामुक्त लढाईत उतरुन माझा मराठवाडा कोरोनामुक्त केला झाला पाहिजे, मी सुरक्षित तर माझे कुटुब सुरक्षित तोंडावर मास्क असले पाहिजे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
दुष्काळमुक्त मराठवाडा करणार
गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाडयात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येवून भविष्यात मराठवाडा दुष्काळग्रस्त होता कामा नये ही जबाबदारी सरकारने घेतली आहे. करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संभाजीनगरसाठी विकास प्राधिकरण स्थापणार
मराठवाडयासह संभाजीनगरचा विकास होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग मुंबई ते नागपूर तयार होत आहे. हा विकासाचा मार्ग संभाजीनगरमधून जात असल्याने हा संपूर्ण परिसर विकासाचा समृध्द होणार आहे. मुंबई, पुणे विकास प्राधिकरणाप्रमाणे संभाजीनगरसाठी विकास प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
मराठवाडा मुक्त झाला म्हणजे स्वातंत्र्य मिळाले असे होत नाही. स्वातंत्र्यामध्ये मोकळा श्वास घेता आला पाहिजे, माझ्या कुटुबाला सुख-समाधानाने राहता आले पाहिजे, यासाठी हे स्वतंत्र मिळवले, आता आपल्या सर्वाची जबाबदारी नव्हे कर्तव्य आहे. ही संधी आपल्या मिळाली असून या संधीचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे. याकरिता शपथ घ्या माझा मराठवाडा कोरोना मुक्त करेन, दुसरी शपथ घ्या जी ताकद तुम्ही आम्हाला दिली, जो आधिकार आम्हाला दिला, ती ताकद व अधिकार माझ्या मराठवाडयाची सुख, समृध्दीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वापरणार. हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आपल्याकडून मिळावी हीच अपेक्षा.
या कार्यक्रमास राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते चंद्रकात खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदिप जैस्वाल, संजय सिरसाट, सतिष चव्हाण, जि. प. अध्यक्षा शेळके, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविणा कन्नडकर यांनी केले.



























































