सरकारी कामे वेगाने करण्यासाठी ई ऑफिस तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणुच्या संकटामुळे आपल्याला कार्यालयीन उपस्थिती आणि कामाचे स्वरूप याबाबत विचार करावा लागतो आहे. या परिस्थितही जनतेची कामे अधिक वेगवान करण्यासाठी ई ऑफिस पद्धत आणखी सक्षम करा. कुठूनही काम करता येईल अशी अत्याधुनिक व्यवस्था तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. त्यानुसार मंत्रालयातील फाईल ही आता ई फाईल, रजांसाठी ई-लीव्ह, व्यवस्थापनासाठी केएमएस आणि एमआयएस या प्रणाली मंत्रालयात सुरू करण्यात येणार आहे.

मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्लाऊड टेक्नॉलॉजीसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करा. निर्णय प्रक्रियेतील प्रत्येक घटकाला अधिकारी-कर्मचारी आणि सचिव ते मंत्री यांना कुठूनही काम करता येईल, अशी प्रणाली तयार करा. ई-ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती-आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयीन प्रशासकीय गतिमानतेबरोबरच नागरिकांना सुविधा देण्यासाठी तक्रार निकारण आणि स्थानिक समस्यांबाबत सोशल मिडीया टिकेटींग, चॅट-बॉट सारख्या गोष्टी वापरण्याबाबत सूचना केल्या.

या बैठकीला पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

परिपत्रकही डिजिटल पद्धतीनेच काढणार
मंत्रालयात येणारे टपाल, तसेच अधिकारी-कर्मचाऱयांच्या रजा-सुट्टी याबाबत पहिल्या टप्प्यात पूर्णपणे ई-ऑफिस प्रणाली वापरण्यात येईल. सुरवातीला काही विभागांना पूर्णपणे ई-ऑफिस वापरण्यासाठी सक्षम करण्यात येईल. त्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येईल. प्रशासकीय सुधारणेचा भाग म्हणून कार्यालयीन कामकाजाच्या हस्तपुस्तिका तसेच विविध प्रकारची परिपत्रकेही यापुढे डिजीटल पद्धतीने काढण्यात येतील असेही सांगण्यात आले.