मृत्युदर रोखणार, रुग्णसंख्या कमी करणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत आहोत. या मोहिमेमुळे येणाऱ्य़ा काळात मृत्युदर आणि कोविड पॉझिटिव्हिटी रुग्णांची संख्या कमी झालेली दिसेल असा ठाम आत्मविश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोनाच्या विरोधात पुकारलेला लढा व योजण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले. कोविडनंतर देखील रुग्णांना वैद्यकीय उपचारांची गरज असून त्यासाठीही उपचार केंद्रे सुरु  करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

दीड लाखापर्यंत चाचण्या वाढवणार

राज्यातील कोरोना चाचण्यांची माहिती देताना ते म्हणाले की, रॅपिड एन्टीजेन चाचणी  निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव्य आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठविला जातो, दररोज दीड लाखपर्यंत चाचण्या वाढवीत आहोत.

राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू

राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलीआयसीयू व्यवस्था सुरु केली असून येणा्रया काळात याची उपयुक्तता पाहता सर्वराज्यात ही यंत्रणा उभारून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील  तज्ज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लसीचे उत्पादन लवकर

लस उत्पादन लवकरात लवकर व्हावे म्हणून ट्रायलची प्रक्रिया लवकर व्हावी तसेच या लसीच्या वितरणाचे योग्य नियोजन आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधानांनी मार्गदर्शन करावे

कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढयाचा आहे याबाबत  पंतप्रधानांनी पुन्हा एकदा देशातील नागरिकांना मार्गदर्शन करावे. येणार्‍या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

थकणार नाहीहरणार नाही

राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा, चाचण्यांची व्यवस्था, प्रयोगशाळा उभारल्या आहेत, आम्ही न थकता लढतो आहोत आणि हरणार नाही असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असून केंद्राने वैद्यकीय ऑक्सिजनच्या किंमतीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे तसेच वितरणाच्या बाबतीत देखील नियंत्रण असणे गरजेचे आहे.

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करा

येत्या 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी आज केले.  गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. त्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबविता येईल. मास्कचा वापर, सोशल डिस्टिंन्सगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी.  गणपती उत्सवाप्रमाणेच  नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकार परिपत्रक काढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या