
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम निर्णय दिला. या निर्णयावर चर्चा करून पुढील रणनीती ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकवणारच. यासाठी न्यायालयात ठामपणे बाजू मांडणार, असा निर्धार करण्यात आला असून कोर्टातील पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शुक्रवारी 4 वाजता मराठा संघटनांचे प्रतिनिधी, वकील मंडळी, अभ्यासक व जाणकारांशी चर्चा करणार आहेत.
मराठा आरक्षणाबाबत आलेल्या आदेशानंतर पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मंत्र्यांसोबत बैठक घेतली. राज्याचे अधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सचिव राजेंद्र भागवत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब आदी यावेळी उपस्थित होते.
मराठा समाजाने षड्यंत्र हाणून पाडावे – अशोक चव्हाण
काही मंडळींनी जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट केल्या जात आहेत. चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. मराठा समाजाने संतापून कायदा हातात घ्यावा आणि त्याचा राजकीय वापर करता यावा तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची चुकीची प्रतिमा निर्माण करता यावी, या हेतूने हे कारस्थान केले जात आहे. समाजाने हे षड्यंत्र ओळखण्याची आणि हाणून पाडण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.




























































