खासगी सावकार सहकार विभागाच्या रडारवर, मुंबईतील 83 जणांचा परवाना रद्द होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वर्षानुवर्षे सावकारी करणारे खासगी सावकार सहकार विभागाच्या रडारवर आले आहेत. त्यानुसार सावकारी व्यवहाराचे दप्तर न ठेवणे, शासकीय फी न भरणे, परवान्याचे नूतनीकरण न केल्याचा ठपका ठेवता आतापर्यंत 21 सावकारांचे परवाने रद्द केले असून 62 जणांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे यापुढे बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्यांची खैर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई शहरात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात 2020-21 या वर्षात 727 एवढे नोंदणीकृत सावकार होते, मात्र चालू वर्षी अनेक सावकारांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण केले नाही. तसेच अनेकजण सहकार कायद्यानुसार आपल्या व्यवहाराचे दप्तर ठेवत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत 21 जणांचे परवाने पूर्णपणे रद्द केले आहेत, तर नूतनीकरणासाठी आलेल्या 671 पैकी केवळ  624 सावकारांना परवाना दिला आहे.

परवान्याचे नूतनीकरण वेळेतच करणे बंधनकारक

आतापर्यंत अनेक सावकार परवान्याची मुदत संपल्यानंतरही सावकारी सुरूच ठेवत होते. पण यापुढे सावकारांना 31 मार्च पूर्वी नियमित फी भरून तर  31 मेअखेर विलंब शुल्क भरून परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक केले आहे. परवान्याचे नूतनीकरण न करता व्यवसाय करणाऱ्या सावकारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.