सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिवृष्टीचे कारण देत राज्य सरकारच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था, नामनिर्देशन सुरू करण्यात आलेल्या व नामनिर्देशन सुरू न झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यातील सुमारे 32 हजार 743  सहकारी संस्थांपैकी 7620 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. यातील 5636 सहकारी संस्थांचे नामनिर्देशन सुरू झाले होते तर 1984 संस्थांचे नामनिर्देश सुरू व्हायचे होते. यातील बहुतांशी संस्था या ग्रामीण भागात असल्याने आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती पाहता या निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

पराभव समोर दिसल्याचा परिणाम

सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत. आता निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असून केवळ मतदानाची प्रक्रिया बाकी आहे. या परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलणे लोकशाहीविरोधी आहे. या निवडणुकांत भाजपला पराभव दिसत असल्यानेच त्या पुढे ढकलल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली.