विमानतळावरून 28 कोटींचे कोकेन हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांच्या बॅगेत विशिष्ट कप्पा करून कोकेनची तस्करी करणाऱ्या एका हिंदुस्थानी नागरिकाला सीमा शुल्क विभागाने अटक केली. त्याच्याकडून 28 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. या महिनाभरात सीमा शुल्क विभागाची तिसरी मोठी कारवाई आहे.

अदिस अबादा येथून एक प्रवासी हा ड्रग घेऊन दिल्लीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. त्या माहितीनंतर सीमा शुल्क विभागाने आज सकाळी एका प्रवाशाला ताब्यात घेतले. त्या प्रवाशाकडील महिला बॅगेची तपासणी केली. त्या बॅगेत विशिष्ट कप्पा तयार केला होता. त्यात 28 कोटी रुपयांचे कोकेन लपवले होते. सीमा शुल्क विभागाने त्या प्रवाशाची कसून चौकशी केली. काही दिवसांपूर्वी त्या प्रवाशाची फेसबुकवर एका महिलेसोबत ओळख झाली होती. सुरुवातीला त्या महिलेने त्याला नोकरीच्या भूलथापा मारल्या. त्यानंतर महिलेने ड्रग तस्करीत पैसे देऊ असे सांगून त्या प्रवाशाला ड्रगच्या काळय़ा धंद्यात जाळय़ात ओढले. पैशाच्या नादात तो प्रवासी अदिस अबादा येथे गेला होता.