धुळे महानगराच्या हद्दीत आचारसंहिता लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धुळे

धुळे महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केला. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपासून धुळे महानगराच्या हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली. आचार संहिता सुरू झाल्याने शहरातील निरनिराळय़ा राजकीय पक्ष आणि संघटनाचे होर्डिंग, बॅनर आणि शुभेच्छा देणारे फलक महापालिका प्रशानाकडून हटविण्यात आले. आचार संहिता लागल्याने महापालिका आयुक्तांच्या दालनात निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी सकाळी झाली. निवडणूक कार्यक्रमानुसार 9 डिसेंबरला मतदान आणि 10 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

धुळे महापालिकेच्या तिसऱ्या पंचवार्षिकची मुदत 29 डिसेंबर 2018 ला संपत आहे. यामुळे महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सायंकाळी कार्यक्रम जाहीर केला. यात 13 ते 20 नोव्हेंबरदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे. 9 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या काळात मतदान होईल. निकाल जाहीर होईल. धुळे महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महापालिकेने सर्व पक्ष, संघटनांचे फलक, होर्डिंग, बॅनर तसेच झेंडे हटविण्यास सुरुवात केली आहे.

यासाठी महापालिका कर्मचाऱयांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत. शहरातील मुख्य बाजार पेठ असलेला आग्रारोड, महापालिका परिसर, महाराणा प्रताप चौकातील होर्डिंग आणि बॅनर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत हटविण्यात आले. तर विविध विकासकामांवर असलेले शिलालेख आणि इतर मजकूर झाकण्याचे काम शुक्रवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती प्रसाद जाधव यांनी दिली.

summary- code of conduct starts in dhule