
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली असून मुंबईकर तर अक्षरशः कुडकुडले आहेत. मुंबईत आज शुक्रवारी 13.4 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मौसमातील हे सर्वात कमी तापमान आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, घशात खवखव, डोळ्यांची जळजळ होण्याच्या तक्रारी वाढल्या असून डॉक्टरांकडे रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश येथे मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी झाली असून थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानात तापमान घसरले आहे. उत्तरेतील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रात शिरकाव केला असून कोकण, गोव्यातील तापमान खाली आले आहे. मराठवाडा, विदर्भात गारांचा तर इतरत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. पुढचे 48 तास मुंबईत अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.



























































