
सामना ऑनलाईन, पंढरपूर
गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या भक्त निवासाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून बांधकाम त्वरित पूर्ण करा असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व मंदिर समिती व्यवस्थापनाला दिले. शिवसेनेच्या उपनेत्या आणि आमदार डॉ नीलम गोऱ्हे यांनी आमदार निधीतून उभारल्या जात असलेल्या अर्धवट अवस्थेतील भक्त निवासाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.
वारकऱ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी भक्त निवास उभारण्याचा प्रस्ताव मंदिर समितीने २००७ मध्ये राज्यशासनाकडे सादर केला होता. महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी आपल्या आमदार निधीतून काही रक्कम देण्याची विनंती केली होती त्यानुसार ७० आमदारांनी आपल्या निधीमधून २ कोटी 4 लाख रुपये सोलापूर जिल्हाधिकारी यांचेकडे जमा केले होते. १३ जानेवारी २००९ भक्त निवासाचे बांधकाम सुरू झाले. भक्त निवासासाठीची निविदा ७ कोटी १४ लाख रुपये इतकी होती. या खर्चातून २१०० चौ.मी. इतके बांधकाम करुन भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन होते. मात्र गेल्या नऊ वर्षांत हे बांधकाम पूर्ण झाले नाही. या कामावर आजवर २ कोटी ४ लाख रुपये सा.बा. विभागाने खर्च केले आहेत. आता निधी अभावी हे काम रखडले असून केलेल्या बांधकामाची बरीच पडझड झाली आहे. आमदारांनी दिलेल्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाला नसल्याची तक्रार आमदार गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली होती.

































































