लॉकडाऊनमध्ये दुकानदारांना  व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी! मुंबई प्रदेश काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा व्यावसायिक आणि दुकानदारांना मोठा फटका बसला आहे. त्यातून ते कसेबसे सावरत आहेत. त्यामुळे आताच्या लॉकडाऊनमध्ये व्यावसायिक आणि दुकानदारांना व्यवसाय करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली पाहिजे अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्व व्यापारी आणि दुकानदार शासनाचे सर्व नियम, अटी आणि निर्बंध पाळण्यास तयार आहेत. तसेच त्यांच्याकडील सर्व कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचीही त्यांची तयारी आहे. त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी सरकारने द्यावी जेणेकरून लाखो कामगारांचे रोजगार वाचू शकतील, असे जगताप यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई काँग्रेसच्या वतीने मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांमध्ये 10 ते 30 एप्रिल या कालावधीत रक्तदान शिबिरे आयोजित करून दहा हजार बाटल्या रक्त संकलित करण्याचा निर्णय मुंबई काँग्रेसने घेतला असल्याची माहितीही जगताप यांनी दिली.