
सामना प्रतिनिधी, नागपूर
विमा दाव्याचे एक लाख रुपये 30 दिवसांत तक्रारकर्त्यास अदा करण्यात यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला आणि या आदेशाची 30 दिवसांत अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास त्यानंतर एक लाख रुपयांवर 9 टक्के व्याज द्यावे लागेल, असे स्पष्ट केले. तसेच ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता 10 हजार व तक्रारीच्या खर्चापोटी 5 हजार अशी एकूण 15 हजार रुपयांची भरपाई मंजूर केली. ही रक्कमही कंपनीने द्यायची आहे.
मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व स्मिता चांदेकर यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे कंपनीला जोरदार चपराक बसली. शंकर अवचट असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते रामटेक येथील रहिवासी आहेत. राज्य सरकारने 2012मध्ये शेतकऱ्यांचा अपघात विमा काढला होता. त्या अंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख व अपंगत्व आल्यास 50 हजार ते एक लाख रुपये भरपाई देणे निर्धारित होते. विम्याचा कालावधी 15 ऑगस्ट 2012 ते 14 ऑगस्ट 2013पर्यंत होता.
दरम्यान, 23 सप्टेंबर 2012 रोजी अवचट यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या नावावर पारशिवनी येथे शेतजमीन होती. त्यामुळे अवचट यांनी आवश्यक कागदपत्रे गोळा करून 11 सप्टेंबर 2015 रोजी विमा दावा दाखल केला. परंतु कंपनीने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही. परिणामी अवचट यांनी ग्राहक मंचात धाव घेतली होती. कंपनीने मंचमध्ये उत्तर दाखल करून विविध मुद्दे उपस्थित केले व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. त्यानंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता अवचट यांची तक्रार अंशतः मंजूर करून हा निर्णय दिला.



























































