
बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून दोघा भावांनी साथीदारांच्या मदतीने कंटेनरचालक संजय भगवान चव्हाण (वय 30, रा. महमदाबाद, हुन्नूर, ता. मंगळवेढा) याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगोला पोलिसांनी या गुह्याचा चोवीस तासांत छडा लावत मुख्य सूत्रधारांना गजाआड केले. तर अन्य तीन आरोपींना आज ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास जगताप व तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांनी दिली.
मुख्य सूत्रधार अनिल जकाप्पा पुजारी, सुनील जकाप्पा पुजारा यांच्यासह त भाऊसाहेब उर्फ अनिल उर्फ अण्णा दाईगंडे, समाधान दाईगंडे (सर्व रा. हुन्नूर ता. मंगळवेढा), अंकुश सलगर (रा. लक्ष्मीटाकळी, ता. पंढरपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत भगवान चव्हाण यांनी फिर्याद दिली होती.
‘तुमच्या बहिणीला पळवून नेले, तुम्ही माझे काय केले?’ अशी खुन्नस देणाऱया कंटेनरचालक संजय चव्हाण याचे अपहरण करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून करून अपघाताचा बनाव करण्यात आला होता. आरोपींनी संजय याचे नेज (ता. चिक्कोडी, बेळगाव) येथून अपहरण केले. त्याचा उदनवाडी ते चोपडी रस्त्यावर खून केला. नंतर अपघाताचा बनाव करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले. घटनास्थळी कोणताही प्रथमदर्शनी पुरावा नसताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून पाच आरोपींना चोवीस तासांत अटक केली. यातील चार आरोपींना न्यायालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांनी स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची दोन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती. दरम्यान, तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक काटकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पुजारी बंधूंना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुह्याची कबुली दिली. सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर, पोलीस नाईक राहुल कोरे, अभिजित मोहोळकर, दत्ता वजाळे, सचिन वाघ, सिद्धनाथ शिंदे यांनी केली.





























































