नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढविणार; राणी लंके यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढविणार असा निर्धार राणी लंके यांनी पुन्हा एकदा जाहीर केला आहे. त्यामुळे नगरमध्ये भाजप आणि मित्रपक्षातील धुसफूर आणि संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. तसेच नगरमध्ये विखे यांच्याविरोधात भआजपमध्येही रोष वाढत आहे. त्यातच आता राणी लंके यांनी काहीही झाले तर दक्षिण नगर मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.

मराठी माणसांची अस्मिता आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवराय मनामनात शिवराय घराघरात नगर दक्षिण मतदार संघात पोहोचविण्यासाठी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता श्रीगोंदा शहरात शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाले. यावेळी राणी लंके यांनी सांगितले की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लंके कुटुंबातून एक जण शंभर टक्के लढवणारच आहे. समोरचा उमेदवार कोणीही असो याबाबत कुठली शंका मनात आणू नये, असे यांनी ठामपणे सांगितले.

3 जानेवारी रोजी पाथर्डी येथून श्री क्षेत्र मोहटा देवी येथे महापूजा करून शिवस्वराज्य यात्रेस सुरवात झाली. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महाराज यांचे दर्शन घेतल्यावर राणी लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार नीलेश लंके कुटुंब जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे. सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी व विकासासाठी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. निलेश लंके यांना आमदारऐवजी सर्व जनता त्यांना लोकनेते मानतात. तसेच मतदार संघातील जनतेच्या आग्रहाखातर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील 6 तालुक्यांतील प्रत्येक गावात शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे .15 जानेवारी रोजी यात्रेची सांगता नगर येथे नीलेश लंके यांच्या उपस्थितीत होणार आहे.