
कोरोना महामारीच्या काळात नियमित वीज कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱया हजारो कंत्राटी वीज कामगारांना आता विम्याचे कवच मिळाले आहे. कंत्राटी कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास कंत्राटदार किंवा वीज कंपनी जबाबदारी घेत नाहीत.
त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने वेलफेअर फंडाची स्थापना करत ऑरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून तब्बल 10 लाख रूपयांची अपघाती विमा योजना सुरु केली आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटी कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांमध्ये सुमारे 17 हजार कंत्राटी वीज कामगार कार्यरत आहेत.
गेल्या वर्षभरात राज्यातील 40 कंत्राटी वीज कामगारांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांना कोणतेच आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. त्याची दखल घेत वीज कंत्राटी कामगार संघाने वेल्फेअर फंडाची स्थापना करत आपल्या सदस्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्सच्या माध्यमातून अपघाती विमा योजना सुरु केली आहे.





























































