
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी स्थापन केलेल्या निवडणूक प्राधिकरणाला आठ वर्षांनंतरही हक्काचे कर्मचारी मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांना प्राधिकरणाचे दैनंदिन काम चालवण्यासाठी इतर विभागांतील कर्मचारी उसनवारीवर घ्यावे लागत आहेत. याआधी प्राधिकरणाने सहकार विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांना कंत्राटी तत्त्वावर घेण्यासाठी जाहिरात काढली होती. त्यानंतर आता इतर विभागांतील कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेण्यासाठी जाहिरात काढली आहे.
राज्यात जवळपास सवादोन लाख सहकारी संस्था असून सहकार कायद्यानुसार त्यांच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर आहे. त्यानुसार मुदत संपलेल्या सहकारी संस्थांना निवडणुका घेण्याबाबत नोटीस देणे, सभासदांच्या मतदार याद्या तयार करणे, त्यावर आलेल्या हरकतींची दखल घेऊन त्या अंतिम करणे, निवडणूक कार्यक्रम तयार करणे आदी कामे करावी लागतात. पण सध्या प्राधिकरणाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने सदरची सर्व कामे संबंधित जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचार्यांवर पडत आहे.
त्याची दखल घेत प्राधिकरणाने याआधी अधिकारी आणि कर्मचाऱयांची पदे निवृत्त कर्मचाऱयांमधून भरण्यासाठी जाहिरात काढली होती. त्यानंतर आता उच्च लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लिपिक व टंकलेखक अशी 11 पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत असे आवाहन केले आहे.
तीन वर्षांचा प्रतिनियुक्ती कालावधी
निवडणूक प्राधिकरणाकडून प्रतिनियुक्तीवर घेतल्या जाणाऱया कर्मचाऱयांचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. त्यानंतर प्राधिकरणाच्या गजरेनुसार दोन वर्षांचा कालावधी वाढ केला जाऊ शकतो. अन्यथा तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता नियुक्ती संपुष्टात येणार आहे.



























































