कुटुंबातल्या कर्त्या पुरुषांचे कोरोनाने घेतले सर्वाधिक बळी, 2021 च्या लाटेत 56 हजार 960 पुरुषांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामध्ये संपूर्ण देशातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोविडच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक होती. कोरोनाच्या दोन-तीन लाटांमध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 39 हजार 7 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. यामध्ये घरातल्या कमावत्या पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे राज्याच्या आरोग्य खात्याला आढळून आले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ केरळ राज्यातील कोरोना बळींची संख्या अधिक आहे.

देशात व राज्यात मार्च 2020मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मार्च 2020 ते ऑक्टोबर 2021 या काळात राज्यात 1 लाख 39 हजार 007 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात 92 हजार 212 पुरुषांचा आणि 46 हजार 779 महिलांचा समावेश आहे. पण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षणातील नोव्हेंबरमधील ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 1 लाख 48 हजार 404 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या अधिक आहे.

महाविकास आघाडीचा मदतीचा हात

कोरोनामध्ये मृत्युमुखी पडण्याचे पुरुषांचे प्रमाण अधिक होते. पण काही ठिकाणी आई व वडील अशा दोघांचाही मृत्यू झाला. त्यात राज्यातील 851 मुले अनाथ झाली; पण महाविकास आघाडी सरकारने आईवडील गमावलेल्या मुलांना मदतीचा हात दिला. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने अनाथ मुलांच्या नावाने पाच लाख रुपयांची एफडी (मुदत ठेव) ठेवली. या मुलांना दरमहा 1 हजार 1225 रुपये मदत मिळते. याशिवाय पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत अनाथ मुले 23 वर्षांचे होईपर्यंत त्यांच्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा होतील अशी तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण

आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार राज्याच्या तुलनेत मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 81 लाख 35 हजार 620 इतकी आहे. मुंबईतील बाधित कोरोना रुग्णांची संख्या 11 लाख 53 हजार 951 इतकी आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.17 टक्के इतके आहे, तर मृत्युदर 1.82 टक्के इतका आहे.

राज्यातील कोरोना बळींची संख्या व वर्ष

वर्ष मृत्यु पुरुष प्रमाण महिला प्रमाण
2020 54 हजार 570 38 हजार 240 79.05 टक्के 16 हजार 330 29.92 टक्के
2021 89 हजार 054 56 हजार 960 63.95 टक्के 32 हजार 096 36.04 टक्के
2022 2 हजार 794 1 हजार 820 65.13 टक्के 974 34.86 टक्के
(सप्टेंबर 2022 पर्यंतची आरोग्य विभागाची आकडेवारी)