पहिली ते आठवीचे ऑनलाइन वर्ग बंद करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून यानंतरही काही खासगी शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू ठेवले आहेत. यावर पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून हे ऑनलाइन वर्ग बंद करण्याच्या सूचना संबंधित शाळांना द्याव्यात अशी मागणी केली आहे. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार पहिली ते आठवी व नववी ते अकरावीचे निकालपत्र तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार राज्यभर निकालपत्र तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. तरीही काही शाळांमध्ये ऑनलाइन शिकवण्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ऑनलाइन शिकवणी वर्ग बंद करण्याचे तत्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे.