ना रेमडेसिविर… ना महागडी औषधं,तरीही पाच हजार रूग्ण कोरोनामुक्त

कोरोना महामारीचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असून ,अनेकजण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. या संकटकाळात अनेकजण देवदूताच्या रूपाने मदतीसाठी पुढे येत आहेत.जामखेड येथील आरोळे कोविड सेंटरमधील डॉ.शोभा आरोळे,रवी आरोळे ही भावंडे रूग्णांना औषधोपचारांसह चहा ,नाश्ता व दोन वेळेचे मोफत जेवण देत आहे.येथे रूग्णालय ना रेमडेसिवीर दिले जाते ना महागडी औषधे,तरीही आतापर्यंत पाच हजारांहून अधिक रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.

रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त दिवंगत डॉ.रजनीकांत आरोळे यांची कन्या डॉ.शोभा आरोळे व पुत्र डॉ.रवी आरोळे हे जामखेडे येथे ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत जुलिया हे हॉस्पीटल चालवितात,शेतकरी व सामान्य लोकांची कोरोनाच्या नावाखाली खासगी हॉस्पीटलमधून होणारी लूट थांबावी,तसेच उपचारासाठी त्यांच्यावर शेतजमीन विकण्याची वेळ येऊ नये म्हणून आपले आरोळे हॉस्पिटलचे कोविडमध्ये रूपांतर करून मोफत औषधोपचार सुरू केला.आपल्या आई-वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा ही डॉक्टर भावंडे चालवत आहेत.

रेमडेसिवीर व एचआरसीटी हे सध्या फॅड आले आहे.लोकांनी याबाबत मानसिकता बदलण्याची गरज आहे.रूग्णाचा नेमका होणारा आजार आणि त्यासाठी काय द्यावे आणि याबाबत काय द्यावे यासाठी आम्ही आणि इंडियन मेडिकल कौन्सिल मेडिकल रीसर्चने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून औषधांचा वापर केला असून ,रूग्णही बरे होत आहेत.दुसरा आलेला स्ट्रेन घातक आहे.त्यामुळे शासनाच्या सूचनांचे पालन व स्वच्छता राखली तर आपल्याला कोरोना हात लावू शकणार नाही असे मत डॉ.शोभा व रवी आरोळे यांनी व्यक्त केले.

रेमडेसिवीरचा वापर न करता 3700 रूग्ण कोरोनामुक्त

डॉ.आरोळे कोविड सेंटरमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचा वापर न करता मागील वर्षभरात 3700 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.या हॉस्पीटलची रूग्ण क्षमता 150 होती,परंतु आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने या येथे जवळपास 1हजार रूग्ण उपचार घेऊ शकतात. 1मार्च ते 20 एप्रिल 1350 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.सध्या 650 रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

डॉ.आरोळे भावंडांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले की,सध्या कोरोनाचा दुसरा स्ट्रेन घातक आहे.एकाच घरात यापूर्वी दोन-तीन रूग्ण निघत असत आता संपूर्ण घरातील लोक,गल्लीतील परिसर किंवा संपूर्ण गाव संक्रमित होत आहे.यापूर्वी पाच ते नवव्या दिवशी रूग्ण बरा होत होता.आता काही क्रिटीकल रूग्ण बरा होण्यासाठी 15 ते 21 दिवसांचा कालावधी लागत आहे.कोरोनाची लक्षणे बदललेली आहेत.यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

हा संसर्गजन्य आजार असून,तो इतर आजारांप्रमाणे आहे.मात्र,यामध्ये जास्त भिती दाखवली जाते आणि भितीपोटी रूग्ण आपली मानसिकता बदलतो.हा आजार झाला म्हणजे मी जगणार नाही आणि त्यातून रेमडेसिवीरची मागणी केली जाते,तर भविष्यात महागड्या औषधांचा रूग्णांवर साइड इफेक्ट होऊ शकतो,अशी भीती डॉ.रवी आरोळे व्यक्त करतात.

रेमडेसीवीर प्रमाणेच एचआरसीटीची फॅड आले आहे.यापूर्वी हायड्रोक्लोरिक गोळ्याचे फॅड आले होते.एन 95 मास्क सुरक्षीत असल्याचे सांगितले जात असल्याने अनेकजण तीच मागणी करत होते,पण आपले सामान्य कापडी मास्कही चांगले असतात.ब्लड टेस्ट व आरटीपीसीआर या टेस्ट करून उपचार करावेत.90 टक्के लोक सध्या गोळ्या औषधाने बरे होतात,असेही त्यांनी सांगितले.

दानशूरांना केले मदतीचे आवाहान

सध्या या कोविडच्या हॉस्पिटलला मदतीची आवश्यकता आहे.दररोज 80 ऑक्सीजन सिलेंडर लागतात.त्यासाठी दररोज 50 हजार मोजावे लागत आहेत.दररोज 650 रूग्णांना जेवण,नाष्टा,औषधे दिली जात आहेत.रूग्णांनी किमान ऑक्सिजनचे पैसे देणे गरजेचे आहे.आम्ही आता आर्थिक संकटात आहोत.तेव्हा प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे भाजीपाला,किराणा,ऑक्सीजन सिलिंडर,रोखे पैसे अशा स्वरूपात मदत करावी असे आवाहानही आरोळे भावंडानी केले.

आपली प्रतिक्रिया द्या