टोकियो ऑलिम्पिकला कोरोनाचे ग्रहण, एक तर रद्द होणार किंवा प्रेक्षकांविना होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेचा बसलेला फटका… स्थानिक नागरिकांचा वाढता विरोध…आणि सत्तारूढ लिबरल डेमोक्रॅटिक पक्षातील आघाडीच्या अधिकाऱयांनीच दाखवलेली हतबलता…अशा प्रतिकूल परिस्थितीत टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावरील कोरोनाचे ग्रहण आणखी गडद होत चालले आहे. सध्याची बिकट परिस्थिती बघता एक तर यंदाचे ऑलिम्पिक रद्द होऊ शकते किंवा झालेच तर प्रेक्षकांविनाच या क्रीडाविश्वातील सर्वोच्च स्पर्धेचे आयोजन करावे लागणार आहे. टोकियो ऑलिम्पिकचे शंभर दिवसांचे काऊंटडाऊन बुधवारी सुरू झाले अन् गुरुवारी लगेच स्पर्धेच्या आयोजनाबद्दल संदिग्धता निर्माण झाली आहे.

सत्ताधारी पक्षाकडूनच असमर्थता

जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षातील (एलडीपी) दोन आघाडीच्या अधिकाऱयांनी टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनात आता आमूलाग्र बदल करावे लागतील किंवा ही स्पर्धा रद्दही होऊ शकते, असे स्पष्ट विधान केले आहे. एलडीपीचे महासचिव तोशिहिरो निकाई यांनीच आता टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करणे शक्य वाटत नाही, अशी भीती व्यक्त केली. ऑलिम्पिकच्या आयोजनामुळे कोरोनाचा संसर्ग फैलावणार असेल तर ही स्पर्धा घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्याचाही आम्ही विचार करत आहोत, असे निकाई यांनी सांगितले.

‘कोरोनाने अवघ्या जगाला वेठीस धरले. टोकियो ऑलिम्पिकच्या मार्गातही या महामारीने मोठा अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन कसे करायचे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, मात्र मागच्या वेळी आपण जसे ऑलिम्पिकचे आयोजन केले तसे यावेळी नक्कीच नसेल. बघूया, काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.’ – तारो कोनो , प्रभारी मंत्री, टीकाकरण अभियान

…तर रिकाम्या स्टेडियममध्ये होणार स्पर्धा

जपानमध्ये चार हजारहून अधिक नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. या महामारीमुळे आतापर्यंत तेथे साडेनऊ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगाच्या तुलनेत हा आकडा कमी वाटत असला तरी जपान याबाबत फार मोठी रिस्क घ्यायला तयार नाहीये. जपानमधील टीकाकरण अभियानाचे प्रभारी मंत्री तारो कोनो यांनी रिकाम्या स्टेडियममध्ये टोकियो ऑलिम्पिक आयोजन होऊ शकते असे संकेत दिले आहेत. जपानमधील कोरोनाची लाट वेळीच आटोक्यात आली नाही तर प्रेक्षकांविना ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करावे लागणार आहे. कोरोनामुळेच गतवर्षी पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकचे 23 जुलै ते 24 ऑगस्टदरम्यान आयोजन होणार आहे.