कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यात आरबीआयला यश

कोरोनाच्या महामारीमुळे विकसनशील देशांचे कंबरडे मोडले असताना रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने मात्र हिंदुस्थानला सावरल्याचे दिसत आहे. लॉकडाऊननंतर केंद्रीय बँकांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यात आरबीआय यशस्वी झाल्याचे एसबीआयने इकोरॅप अहवालात म्हटले आहे.

स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी हा अहवाल सादर केला आहे. कोरोना महामारीच्या संकटानंतर बाजार पुन्हा सावरू लागल्यानंतर केंद्रीय बँकांसमोर आर्थिक मोकळीक, विनिमय दर स्थिर ठेवणे आदी प्रमुख समस्या होत्या.

लॉकडाऊनमुळे यावर्षी जानेवारी ते मार्चमध्ये 1997 नंतर पहिल्यांदाच आरबीआयची आर्थिक स्वायतत्ता सर्वात खालच्या पातळीवर गेली होती. एप्रिल ते जून ह्या तिमाहीत त्यात सुधारणा पाहायला मिळाली. हिंदूस्थानी बाजारात पुन्हा एकदा स्थिर विनिमय दर दिसू लागले. विनिमय दर आणि आर्थिक मोकळीक यात देखील मार्चच्या तिमाहीत घट झाली होती.

महामारीमुळे बाजारात अनिश्चितता असली तरी नागरिक बँकेत पैसे जमा करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे किरकोळ महागाई दर वाढण्याची शक्यता नाही, असेही अहवालात म्हटले आहे.

हिंदुस्थानचा फॉरेक्स रिझर्व्ह हा जीडीपीपेक्षा 17.7 टक्क्यांनी वाढून कमीत कमी 19.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. फॉरेक्स रिझव्र्हमध्ये 63.8 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या