हिंगोलीत नियम मोडणाऱ्या 10 भाजी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील गांधी चौक, जवाहर रोड भागात असलेल्या मुख्य भाजी मंडई मध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन व नगर पालिका प्रशासनाच्या मार्फत शहरात आठ ठिकाणी सर्व भाजी विक्रेत्यांना जागा नेमून देण्यात आली आहे. मात्र, मुख्य भाजी मंडई मध्ये भाजी विक्रीसाठी बंदी करूनही दुकान मांडणाऱ्या दहा भाजी विक्रेत्याविरुद्ध नगर पालिका प्रशासनाच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली शहराच्या गांधी चौक, जवाहर रोड भागालागत मुख्य भाजी मंडई आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजी मंडई मध्ये एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हा व नगर पालिका प्रशासनाने हिंगोली शहराची व्याप्ती लक्षात घेऊन भाजी विक्रीची आठ ठिकाणे निश्चित केले आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार याबाबतचे आदेश बजावण्यात आले. नगर पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी पोळा मारुती, रिसाला बाजार, सिद्धार्थनगर, जलेश्वर, चिमणी बाजार, बनातवाला हॉल अशा ठिकाणांची निश्चिती केली होती. मात्र बंदी असताना देखील मुख्य भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांनी दुकान थाटले. याबाबतची माहिती हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी रामदास पाटील यांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ पथक पाठवत भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नगर पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहा भाजी विक्रेत्याविरोधात कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 56 अन्वये हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये मोहम्मद आवेस मोहम्मद रफीक, शेख अतीक शेख नजीर, मोहम्मद सलीम फरीद, शेख अनिस शेख बशीर, शेख उस्मान शेख रुख्मान, शेख मोबीन शेख रहमान, शेख आयुब शेख गणी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या