मदतीचा हक्काचा हात!

>> नमिता वारणकर

खासगी रुग्णालयाची वाढीव बिलं ही हल्ली डोकेदुखी ठरली आहे. कोरोना आणि इतर विकारांसाठीही मनाला येतील ते पैसे आकारले जातात. कोविडच्या वाढीव बिलाच्या समस्येसाठी नाशिकमधील सन्मान संस्था पुढे सरसावली आहे.

सन्मान टीम…ही नाशिकमधील स्वयंसेवी संस्था. सध्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खासगी रुग्णालयाच्या भरमसाट फीवाढीचा सामना करावा लागतो. लाखांच्या आकडय़ातलं रुग्णालयाचं बिल मिळालं की ते कसं भरायचं? असा प्रश्न सामान्य कुटुंबांना पडतो.

महाराष्ट्रातील अशा धास्तावलेल्या कुटुंबांसाठी सन्मान टीम आधार बनली आहे. लोकांना दिलासा देणारे हे काम सन्मानचे प्रमुख रवींद्र एरंडे आणि त्यांची टीम करत आहेत.

त्यांच्या या कार्याविषयी ते सांगतात, करोना रुग्णांची संख्या वाढली तेव्हा खासगी रुग्णालयांतही रुग्ण उपचार घेऊ लागले. मात्र सरकारने दिलेल्या या परवानगीचा गैरफायदा खासगी रुग्णालयांनी घेतला. कोरोना उपचाराच्या अवास्तव बिलांचा प्रश्न रुग्णांना भेडसावू लागला. यावर आम्ही काम करायचे ठरवले.

आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी प्रत्येक खासगी रुग्णालयात महानगरपालिकेचा ऑडिटर नेमण्याची घोषणा केली. मात्र शासनाचा असा ऑडिटर आहे, हेच रुग्णांच्या नातेवाईकांना माहीत नाही. या ऑडिटरमार्फत बिल कमी करून घेता येऊ शकते.

आम्ही काम कसे करतो?

या कामाला सुरुवात केल्यापासून दिवसभरात राज्याच्या विविध जिह्यांतून 200 पेक्षा जास्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक संपर्क करतात. वाढीव बिलाबाबत तक्रार आली की, आम्ही त्या त्या भागातील ऑडिटरशी संपर्क करतो. बिले सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कमी करून घेतो. शिवाय ज्यांनी आधी जास्त बिल भरले आहे अशांना रिफंड मिळावे याकरिताही मदत करतो. या कामात ऑडिटरचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे अशी माहिती रवींद्र एरंडे देतात.

रुग्णांच्या मदतीकरिता…

रुग्णांना बिल कमी करून देता येऊ शकते ही माहिती मिळावी याकरिता प्रत्येक रुग्णालयात ऑडिटरचे नाव आणि मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक आहे. शिवाय खासगी रुग्णालयाचे बिल ऑडिटरमार्फतच रुग्णांपर्यंत जावे अशी व्यवस्था करावी, जेणेकरून ते कमी होऊनच रुग्णाला मिळेल असे मत ते व्यक्त करतात.

लोकांचा आशीर्वाद हेच कामाचे मोल…

नुकतंच पुण्यातल्या एका रुग्णाचे 2 लाख 35 हजारांचं बिल कमी केलं. दागिने विकून, घर गहाण ठेवून लोक हॉस्पिटलचं बिल भरतात असे अनेक अनुभव त्यांच्याशी बोलताना लक्षात आले. काही जणांनी आमच्या कार्याला विरोधही केला आहे. तरीही आम्ही हे समाजकार्य करतच राहणार आहोत. लोकांचा आशीर्वाद हेच आमच्या कामाचे मोल आहे. 9422254895 या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रवींद्र एरंडे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या