50 हून जास्त कफ सिरप गुणवत्ता चाचणीत फेल; ‘सीडीएससीओ’च्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांत हवेची गुणवत्ता घसरल्याने नागरिकांना कफ, घशामध्ये खवखवणे, श्वास घेण्यास अडचण यांसारखे आजार होत आहेत. कफ झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्ण मेडिकलमधून कफ सिरप घेतात, परंतु देशातील 50 हून जास्त पंपनीचे कफ सिरप हे गुणवत्ता चाचणीत फेल झाले असून ते प्यायल्याने जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. मुंबईत अशा बोगस कफ सिरपची मेडिकलमधून सर्रास विक्री केली जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ऑक्टोबरपर्यंत जारी करण्यात आलेल्या 2,104 चाचणी अहवालांतून 54 कंपन्यांची 128 म्हणजेच 6 टक्के रिपोर्टमध्ये मानक गुणवत्ताच नाही, असे निदर्शनास आले आहे. सेंट्रल ड्रग्स टेस्टिंग लॅबोरेटरी (सीडीटीएल) मुंबईने 523 नमुन्यांची चाचणी केली. ज्यात 10 फर्मांचे 18 नमुने गुणवत्ता चाचणीत फेल ठरले आहेत. क्षेत्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा (आरडीटीएल) चंदिगडने 284 चाचणी अहवाल प्रसिद्ध केले. त्यात 10 फर्मांचे 23 नमुने एनएसक्यू होते. हिंदुस्थानी फार्माकोपिया आयोग (आयपीसी) गाझियाबादने 502 रिपोर्ट प्रसिद्ध केले. ज्यात 9 फर्मांपैकी 29 गुणवत्ता चाचणी फेल ठरल्या.

मुंबईतही बोगस कफ सिरपची विक्री

सेंट्रल ड्रग्स टेस्टिंग लॅबोरेटरी (सीडीटीएल) ने मुंबईत 523 नमुन्यांची तपासणी केली. यातील 10 फर्मांचे 18 सॅम्पल्स हे गुणवत्ता चाचणीत फेल आढळले आहेत. चंदिगडमध्ये 284 पैकी 23 नमुने हे एनएसक्यू आढळले. गाझियाबादमध्ये 502 नमुन्यांपैकी 29 नमुने हे वाईट गुणवत्तेचे आढळले आहेत.