
केंद्रीय रिझर्व्ह बँकेने नुकताच वार्षिक अहवाल जारी केला आहे. त्यात 2021-22 या आर्थिक वर्षात पकडण्यात आलेल्या बनावट नोटांबाबतही माहिती देण्यात आली आहे. 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये वर्षाला 102 टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच इतर मूल्यांच्याही बनावट नोटांमध्ये वाढ झाली असून अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसला आहे.
अहवालात नमूद केल्याप्रमाणे 2021-22 या वर्षात एकूण 79,669 बनावट नोटा पकडण्यात आल्या. गेल्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये त्यांची संख्या 39,453 होती. तसेच नोटाबंदीदरम्यान बंद करण्यात आलेल्या 500 रुपयांच्या 14 बनावट नोटाही पकडण्यात आल्या आहेत. पकडण्यात आलेल्या बनावट नोटांची एकूण किंमत 3,98,41,500 रुपये आहे.
500 रुपयांच्या नोटांप्रमाणे 2 हजार रुपयांच्याबी बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात 2 हजार रुपयांच्या 13,604 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण किंमत 2,72,08,000 रुपये आहे.
2021-22 या वर्षात 500 आणि 2 हजार रुपयांसह 10,20,50,100 आणि 200 रुपयांच्याही बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अशा एकूण 2,30971 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत 8,25,93,560 रुपये आहे. ही आकडेवारीवरून बनावट नोटांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
या अहवालात पोलीस, ईडी किंवा इतर तपास यंत्रणांनी पकडलेल्या बनावट नोटांचा समावेश नाही. या आकडेवारीत फक्त रिझर्व्ह बँक आणि इतर बँकाकडे आलेल्या किंवा त्यांनी पकडलेल्या बनावट नोटांचा समावेश आहे.
























































