
दापोली आणि मंडणगड तालुक्यात विना परवाना झाडांची बेसुमार तोड होत आहे. रस्तोरस्ती झाडाच्या तोडलेल्या लाकडांचे ढीग साचलेले दिसत आहेत. दोन्हीही तालुक्यातील ग्रामीण भागात झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी न घेताच राजरोसपणे झांडाची तोड होत असल्याचे आढळून आले आहे.
दापोली तालुक्यातील दापोली वाकवली-भडवळे मार्गावरील कोंढे गोरीवलेवाडीजवळ चार ठिकाणी लाकूडसाठयाचा ढीग रचून ठेवलेला आहे, मात्र या लाकूडसाठयाकडे वन विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्याप्रमाणे मंडणगड तालुक्यातील म्हाप्रल शेनाळे सडे तिडे कुबळे मार्गावरील सडे आणि तळेघर गावांच्या हद्दीतच रस्त्यालगतच विना परवाना सागवान, आंबा, शिवन, किंजल, आकेशिया तसेच विविध जंगली प्रजातीच्या झाडांच्या तोडलेल्या लाकडांचा ढीग रस्त्याच्या कडेलाच लाकूड माफिया बऱ्याच दिवसांपासून रचून ठेवतात. यावर वनविभागाकडून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
लाकूड तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. वातावरणाचा समतोल बिघडतो. बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम अनेक ठिकाणच्या पाणीसाठयावर झालेला दिसतो. यामुळे वन संपदा नष्ट होण्याने जंगली वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जंगल कटाईमुळे विविध प्रकारचे हिंस्त्र वन्य प्राणी हे भक्ष्याच्या शोधासाठी आता नागरी वस्तीकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांच्या भीतीने मनुष्यवस्तीतील जीवनमान धोक्याचे होत चालले आहे. यामुळे विनापरवाना होणाऱ्या लाकूडतोडीवर लगाम घालावा, अशी मागणी येथील सुजाण नागरिकांकडून होत आहे.



























































