
कोव्हॅक्सिन लसीचा एक डोसही दोन डोसइतका प्रभावी असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला या लसीचा एक डोस देण्यात आला आणि कोरोनाची लागण न झालेल्या व्यक्तीला दोन डोस देण्यात आले. दोघांमध्येही तितक्याच प्रमाणात कोरोना प्रतिबंधक ऑण्टिबॉडीज निर्माण झाल्याचे दिसून आले.
या संशोधनाचा अहवाल ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. जानेवारीमध्ये तातडीच्या वापराची परवानगी मिळाल्यानंतर ‘बीबीव्ही 152’ म्हणजेच कोव्हॅक्सिनचे दोन डोस चार ते सहा आठवडय़ांच्या कालावधीने दिले जात आहेत. संशोधनात डोस दिलेल्या व्यक्तींच्या शरीरात निर्माण होणाऱया ऑण्टिबॉडीजचे प्रमाण पाहण्यासाठी वेळोवेळी चाचण्या केल्या गेल्या. लस घेण्यापूर्वीच्या एक दिवस आधी, लस घेतल्याच्या 28 दिवसांनंतर आणि 56 दिवसांनंतर अशा या चाचण्या केल्या गेल्या. फेब्रुवारी ते मेदरम्यान चेन्नई येथे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या 114 आरोग्य कर्मचाऱयांमध्ये ही ऑण्टिबॉडीज पाहणी केली गेली. हा निष्कर्ष देशाच्या लसीकरण धोरणासाठी फायदेशीर ठरणार आहे.




























































