कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आला ‘विठुराया’;भक्त निवासात 200 बेडचे कोविड सेंटर

पंढरपूर अन् पंचक्रोशीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरी पडणारी वैद्यकीय सुविधा लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने आपल्या दोन भक्त निवासामध्ये 200 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दैनिक ‘सामना’ला दिली. मंदिर समितीच्या या दिलासादायक निर्णयामुळे साक्षात विठुरायाच कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आल्याची भावना रुग्णांच्या नातेवाईकांना झाली आहे.

पंढरपूर शहरात सध्या कोरोनाचे लागण झालेले 1300 हून अधिक रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. यामध्ये दररोज 200 हून अधिक रुग्णांची भर पडते आहे. दोन शासकीय रुग्णालयांबरोबर 9 खासगी रुग्णालयांत या सर्व रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय श्री संत गजानन महाराज यांच्या मठामध्ये  विलगीकरण कक्ष उभारून तिथे 100 हून अधिक रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. तथापि, रुग्णांची वाढती संख्या पाहता ही सर्व यंत्रणा अपुरी पडू लागली आहे.

रुग्णांना बेडसाठी धावाधाव करावी लागत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना अन्य जिह्यांत हलवावे लागले आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यात दररोज 200 हून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येत आहेत.

मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याने बाधित झालेल्या रुग्णांना तातडीने उपचार करण्याच्या दृष्टीने उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी सुनील जोशी, मुख्याधिकारी अभिजित मानोरकर, तहसीलदार सुशील बेल्हेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले आदी प्रयत्नशील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या