कोविड लसीच्या उत्पादनासाठी मुंबईत 154 कोटी रुपयांचा प्लाण्ट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेकच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी 154 कोटी रुपये खर्च करून मुंबईत नवीन प्लाण्ट सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्यातील लसीकरणाला वेग दिला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परळ येथील हाफकिन इन्स्टिटय़ूटला भेट दिली व प्रयोगशाळेची पाहणीही केली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

इतर उत्पादकांशीही बोलणी

परळ येथील हाफकिन संस्थेत प्रयोगशाळा उभारण्यासाठी जमीन, लस तयार करण्यासाठी आवश्यक असणारा खर्च, तज्ञ मनुष्यबळाची उपलब्धता तपासून घ्यावी. हाफकिनमार्फत एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत अंदाजे 130 कोटी लस निर्माण करण्याची क्षमता आहे. सध्या भारत बायोटेकशिवाय इतर लस तयार करणाऱया उत्पादकांबरोबरही प्राथमिक बोलणी करण्याची सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

केंद्राकडे पाठपुरावा

देशातील काही राज्यांतील कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी, लसीकरणाचा वेग वाढवता यावा याकरिता हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाकडे याबाबत तातडीने पाठपुरावा करावा असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱहाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड, हाफकिन इन्स्टिटय़ूटच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. उषा पद्मनाभन आदि अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचा मुकाबला करत आणि कोरोनासोबत जगायचे असेल तर नागरिकांनी तोंडावर मास्क लावणे, अंतर राखणे व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावाच लागेल. अनावश्यक गर्दी टाळावीच लागेल. मंडया व इतर ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळा. दुर्दैवाने गर्दीमध्ये काही फरक पडला नाही, कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर लॉकडाऊन हा नाइलाजाने एकमेव शेवटचा पर्याय आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यात जमा आहे. ही लाट थोपवायची असेल तर नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ही दुसरी लाट आपण नक्कीच थोपवू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फिल ऍण्ड फिनिश म्हणजे काय?

लस तयार झाल्यावर ती वेगवेगळय़ा टय़ूबमध्ये भरली जाते. या टय़ूब भरण्याच्या प्रक्रियेला फिल म्हणतात आणि पॅकेजिंग प्रक्रियेला फिनिश असे म्हणतात. सध्या ही प्रक्रिया लस बनवणाऱया कंपन्यांकडूनच केली जात आहे. जर हाफकिनमध्ये लसीचे फिल ऍण्ड फिनिश झाले तर लसीचे वितरण अधिक वेगाने होईल आणि परिणामी लसीकरणाचा वेग वाढेल.

हाफकिनला ताकद देण्याची गरज

कोरोनाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. म्हणून हाफकिनची लस उत्पादनात मदत घ्या, त्या संस्थेला परवानगी द्या अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती. देशाला पोलिओमुक्त करण्यात हाफकिनचे मोलाचे कार्य आहे. हाफकिनला आता पुन्हा ताकद देण्याची गरज असून या संस्थेला हवे ते आम्ही देणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सध्या लस बनवणाऱया इतर कंपन्यांसोबत आपण इथे लस तयार करू शकतो का किंवा फिल ऍण्ड फिनिश करू शकतो का याचा आढावा आपण घेत आहोत, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

अन्य लसींचेही उत्पादन

पहिल्या टप्प्यात भारत बायोटेकडील लस ठोक स्वरूपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कुप्यांमध्ये भरून आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिली जाईल. सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वतीने होते. ‘कोवॅक्सिन’ या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोविड लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरू ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या प्लाण्टमधून श्वानदंशावरील लस विकसित करून या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणाऱया अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लाण्टचा उपयोग करण्यात येईल. भारत बायोटेककडून ठोक स्वरूपात कोविड लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे