
बेटींग हरल्यानंतर ठरलेले पैसे परत न दिल्याने तरूणाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा यूनिट दोनच्या पथकाने दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
विशाल चंद्रकांत अमराळे (32, रा. बिबवेवाडी) आणि लहु जनार्दन माने (40, रा. सुखसागरनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, निखील ऊर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (32, रा. आंबेगाव बुद्रुक,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनभुले हे कन्स्ट्रक्शन व्यवसायात काम करत होता. या प्रकरणी मयताच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. ही घटना फ्लाइंग बर्ड स्कुल आंबेगाव ते बिबवेवाडीतील के के मार्केट दरम्यान 15 नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल अमराळे हा क्रिकेट मॅचवर बेटींग घेतो. त्याच्याशी मयत निखीलची ओळख होती. निखीलने नुकत्याच झालेल्या क्रिकेट मॅचवर बेटींग लावले होते. यामध्ये तो 28 हजार रुपये हरला होता. ही रक्कम देण्यास निखील टाळाटाळ करत होता. यामुळे दोघाही आरोपींनी त्याला अनेकदा धमकावले होते. तरीही निखील याने पैसे परत केले नाही. अखेर 15 नोव्हेंबर रोजी आरोपींनी निखील याला आंबेगाव भागात बोलावून घेतले. तेथून अमराळे व साथीदार लहू यांनी निखीलचे अपहरण केले. त्याला के के मार्केट येथे कोंडून ठेवत मारहाण केली. यानंतर जखमी अवस्थेत त्याच्या घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर झोपेत असतानाच निखीलचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्युची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात मारहाण झाल्याचे स्पष्ट होताच खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतरच्या तपासात निखीलचा मृत्यू विशाल आणि लहू यांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे निष्पन्न झाले. विशाल याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. तर, माने हा सुखसागर येथे असल्याची माहिती गुन्हे शाखा यूनिट दोनला मिळाली. यानूसार हवालदार उज्वल मोकाशी, उत्तम तारू, गजानन सोनूने, प्रमोद कोकणे, शंकर नेवसे यांच्यासह पथकाने माने याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट पुढील तपास करीत आहेत.

























































