IPL 2020 – कमबॅकसाठी झुंज! मुंबईचा सामना पंजाबशी

गतविजेता मुंबई इंडियन्स व पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावत असलेला किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये उद्या आयपीएलमधील लढत रंगणार आहे. याप्रसंगी दोन्ही संघ मागील पराभवाला मागे टाकत झोकात पुनरागमनासाठी जिवाचे रान करताना दिसतील. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला तसेच लोकेश राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबला पहिल्या तीन लढतींमध्ये फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे गुरुवारी होणारी लढत दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या लढतीत कोणता संघ ‘भारी’ ठरतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हार्दिक पांडय़ाला सूर गवसेना

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ाकडून मुंबई इंडियन्सला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पुन्हा दुखापत होऊ नये यासाठी मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत त्याला गोलंदाजी देण्यात आलेली नाही. मात्र तरीही फलंदाजीतही हार्दिक पांडय़ाला ठसा उमटवता आलेला नाही ही खेदजनक बाब. हार्दिक पांडय़ाने फलंदाजीत चमक दाखवल्यास रोहित शर्माच्या खांद्यावरील भार कमी होईल. इशान किशन, कायरॉन पोलार्ड यांनी मागील लढतीत फलंदाजीत दमदार कामगिरी केलीय. त्यांच्याकडून याच कामगिरीची पुनरावृत्ती व्हावी अशी आशा मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापन करीत असेल.

बुमराह वि. राहुल

मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह व किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार व फॉर्ममध्ये असलेला फलंदाज लोकेश राहुल यांच्यामधील द्वंद्व पाहण्याची संधी उद्या तमाम क्रिकेटप्रेमींना लाभणार आहे. या दोन खेळाडूंमधील झुंजीत जो जिंकेल त्याचा संघ या लढतीत बाजी मारील असे म्हटले तरी यावेळी वावगे ठरणार नाही. अर्थात क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. पण तरीही या खेळामध्येही ‘वन मॅन शो’चा प्रत्यय सर्वांनीच अनुभवलाय हेही विसरता कामा नये.

अखेरचा ‘पंच’ देण्यात अपयशी

किंग्ज इलेव्हन पंजाबने तिन्ही लढतींत जबरदस्त कामगिरी केलीय, पण त्यांना फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आलाय. दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स या दोन्ही लढतींत विजयासमीक जाऊन त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मार्क्स स्टोयनीस व पॅगिसो रबाडा यांच्यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तर संजू सॅमसन, राहुल तेवतीया यांच्यामुळे राजस्थान रॉयल्स यांच्याविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबला हारचा सामना करावा लागलाय. अखेरच्या क्षणांमध्ये ‘सॉल्लिड पंच’ देण्यात त्यांचा संघ कमी पडतोय. या महत्त्वाच्या बाजूंवर त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

  • आजची लढत – मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी – रात्री 7.30 वाजता)
आपली प्रतिक्रिया द्या