
मागील दोन मोसमातील चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि ही स्पर्धा दोन वेळा जिंकणारा कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये उद्या आयपीएलमधील लढत रंगणार आहे. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून हार सहन करावी लागली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ या स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी उद्याच्या लढतीत प्रयत्न करताना दिसेल. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून या स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. आता हाच फॉर्म कायम राखण्यासाठी हा संघ जिवाचे रान करील. बघूया उद्याच्या लढतीत कोणता संघ बाजी मारतोय ते…
इतिहास मुंबईच्या बाजूने
मुंबई इंडियन्स -कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आतापर्यंत 27 लढती पार पडल्या आहेत. मुंबई इंडियन्सने 21 लढतींमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कोलकाता नाइट रायडर्सला फक्त सहाच लढतींमध्ये विजय मिळवता आला आहे. आयपीएलचा इतिहास मुंबई इंडियन्सच्या बाजूने असला तरी सध्याचा फॉर्म हा कोलकाता नाइट रायडर्सच्या बाजूने आहे. त्यामुळे उद्या होणारी दोन संघांमधील लढत ही रोमहर्षक ठरेल हे निश्चित.
फलंदाजांना चुका महाग पडणार
सलामीच्या लढतीत कर्णधार रोहित शर्मा झटपट बाद झाल्यानंतर ख्रिस लीन व सूर्यकुमार यादव यांनी धावफलक चढता ठेवला होता. त्यानंतर इशान किशनही छान खेळला. पण अखेरच्या काही षटकांमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना अपयशाचा सामना करावा लागला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर मुंबई इंडियन्सने मोक्याच्या क्षणी पाच फलंदाज गमावले. त्यामुळे अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. हार्दिक पांडय़ा, कृणाल पांडय़ा, कायरॉन पोलार्ड यांच्यासह प्रत्येक फलंदाजांना यापुढे चुका करता येणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विण्टॉन डी काॅक याचे उद्याच्या लढतीत पुनरागमन होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्ससाठी ही आनंदाची बातमी असेल.
नितीश, राहुल, दिनेश, प्रसिध, कमिन्स, शाकीब फॉर्ममध्ये
कोलकाता नाइट रायडर्ससाठी सलामीची लढत आनंददायी ठरली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत सर्व बाबी त्यांच्या मनाजोगत्या घडल्या. नितीश राणा, राहुल त्रिपाठी यांची अर्धशतकी खेळी… दिनेश कार्तिकची अखेरच्या षटकांमध्ये दे दणादण फटेकबाजी… पॅट कमिन्स, प्रसिध पृष्णा, शाकीब हसन यांची प्रभावी गोलंदाजी… या सर्व बाबींमुळे कोलकाता नाइट रायडर्सला दिमाखदार विजय मिळवता आला. आता मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी क्रिकेटपटू उत्सुक असतील यात शंका नाही.
सहावा गोलंदाज पोलार्ड
मुंबई इंडियन्सकडून सलामीच्या लढतीत पाच गोलंदाज वापरण्यात आले. ट्रेण्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह, माकां यान्सेन, कृणाल पांडय़ा व राहुल चहर यांनी प्रत्येकी चार षटके गोलंदाजी केली. हार्दिक पांडय़ाला दुखापत होऊ नये यामुळे त्याला गोलंदाजीपासून दूर ठेवण्यात येत आहे. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक झहीर खान यावेळी म्हणाले, हार्दिक पांडय़ा सध्या गोलंदाजी करणार नाही. आगामी लढतींमध्ये तो नक्कीच गोलंदाजी करील. पण आमच्याकडे कायरॉन पोलार्ड हा सहावा गोलंदाजी पर्याय आहे. त्याच्याकडे अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
आजची आयपीएल लढत
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स (चेन्नई, रात्री 7.30 वाजता)




























































