विजयाच्या बोहणीसाठी रस्सीखेच! कोलकातासमोर हैदराबादचे आव्हान

पहिल्या लढतीत पराभवाला सामोरे गेलेल्या दोन संघांमध्ये उद्या आयपीएल लढत रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणाऱया लढतीत दोन्ही संघ यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयाला गवसणी घालण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील यात शंका नाही. दिनेश कार्तिकची सेना डेव्हिड वॉर्नरच्या ब्रिगेडचा कसा सामना करतेय हे पाहायला नक्कीच आवडणार आहे.

कार्तिक, कुलदीप, शुभमन यांच्यावर दडपण

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक, डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव व युवा फलंदाज शुभमन गिल या हिंदुस्थानातील खेळाडूंवरील दबाव सामन्यागणीस वाढू शकतो. त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सला विजयाची लय मिळायला हवी. युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने पहिल्या लढतीत चांगली कामगिरी केलीय. उद्या त्याच्याकडून त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल.

वॉर्नर, बेअरस्टॉ, राशीद, भुवी चमकल्यास…

कर्णधार डेव्हिड वॉर्नर, आक्रमक सलामीवीर जॉनी बेअरस्टॉ, टी-20 तील अव्वल फिरकीवीर राशीद खान व हिंदुस्थानचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे खेळाडू चमकल्यास सनरायझर्स हैदराबादचा विजय पक्का असेल. मनीष पांडे, विजय शंकर व संदीप शर्मा हे त्यांच्या दिमतीला असतीलच. एकूणच काय तर उद्या रोमहर्षक लढत पाहायला मिळेल हे निश्चित.

अव्वल परदेशी खेळाडूंची फौज

कोलकाता नाईट रायडर्सकडे अव्वल परदेशी क्रिकेटपटूंची फौज आहे. सुनील नारायण, आंद्रे रस्सेल, ओएन मॉर्गन व पॅट कमिन्स हे चारही खेळाडू टी-20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करू शकतात. पण या चौघांचा कोणत्या प्रसंगी उपयोग करायला हवा याचा विचार कोलकाता नाईट रायडर्स संघ व्यवस्थापनाकडून करायला हवा.

जेसन होल्डर नवसंजीवनी घेऊन येईल?

सनरायझर्स हैदराबादला सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून हार सहन करावी लागली. मिचेल मार्श या अष्टपैलू खेळाडूला दुखापत झाली. तो या स्पर्धेमधूनही बाहेर गेला. त्याच्याऐवजी वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरची संघात वर्णी लागली आहे. क्वारंटाइन कालावधीमुळे त्याला अंतिम अकरामध्ये केव्हा संधी मिळेल हे सांगता येणार नाही, पण त्याची उपस्थिती संघाला नवसंजीवनी देऊ शकते.

  • आजची लढत – कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायझर्स हैदराबाद (शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी, रात्री 7.30 वाजता)
आपली प्रतिक्रिया द्या