आयपीएलसाठी हार्दिक पांडय़ा रणजी स्पर्धेला लावणार वाटाण्याच्या अक्षता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ाने रणजी ट्रॉफी न खेळण्याचा निर्णय घेतलाय. आगामी रणजी ट्रॉफीची सुरुवात 10 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी बडोदा संघाची घोषणा झाली असून केदार देवधरकडे कर्णधारपद आणि विष्णू सोलंकीकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.आयपीएलसाठी देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटला वाटाण्याच्या अक्षता लावण्याच्या पांडय़ाच्या या धक्कादायक निर्णयामुळे क्रिकेट शौकीन त्याच्यावर नाराज झालेले दिसत आहेत.

आयपीएल 2022 साठी अहमदाबाद संघाचा कर्णधार हार्दिक पांडय़ा जोरदार तयारी करत आहे, पण आयपीएलसाठी उपलब्ध असलेल्या हार्दिकने रणजी स्पर्धेतून माघार घेतली आहे. हार्दिक गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर हार्दिकने फिटनेसचे कारण सांगून निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने म्हटले होते की, हार्दिकला दुखापत होती आणि तो पूर्ण फिट होत नाही तोपर्यंत ब्रेक देण्यात आलाय. जेणेकरून तो हिंदुस्थानी क्रिकेटची सेवा करू शकेल. मला विश्वास आहे की, तो रणजी ट्रॉफी खेळताना दिसेल. मात्र हार्दिकने गांगुली यांचा सल्लाही मानला नाही.

2019पासून पांडय़ा दुखापतींना तोंड देतोय

हार्दिक पांडय़ा 2019मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कपपासून दुखापतीला तोंड देत होता. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रियादेखील झाली होती. त्यामुळे तो गोलंदाजीसाठी फिटनेस मिळवू शकला नाही. आयपीएलच्या गेल्या हंगामात त्याने गोलंदाजी केली नव्हती. टी-20 विश्वचषकातदेखील सुरुवातीच्या सामन्यात तो गोलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे हार्दिकने प्रथम हिंदुस्थानी संघातील स्थान गमावले आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सनेदेखील त्याला रिटेन केले नाही.आयपीएल 2022 मध्ये हार्दिक प्रथमच ‘अहमदाबाद टायटन्स’ अनेतृत्व करताना दिसणार आहे.