खेडमध्ये हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
खेड येथे लाकूड डोक्यात घालून हल्ला करत खून करणाऱ्या आरोपीला खेड पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा रत्नागिरीने अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
20 मे रोजी सुरेश कोळे (35) हे दापोली येथून भरणेनाका येथे सायंकाळी पाच वाजता आले. त्यानंतर भरणेनाका येथील भोरे कॉम्प्लेक्स अपार्टमेंट समोरील मैदानात रात्रीचे जेवण करून झोपले असता मध्यरात्री जागं आल्यानंतर एक इसम जवळ बसलेला सुरेश कोळे यांना दिसला. त्यावेळी सुरेश कोळे ओरडल्यामुळे त्यांची पत्नी जागी झाली. त्यानंतर तो अनोळखी इसम तेथून निघून गेला. थोड्यावेळाने जाड लाकूड घेऊन येऊन सुरेश कोळे यांच्या डोक्यात लाकूड मारुन त्यांना जखमी केले आणि तो पळून गेला. सुरेश कोळे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. 21 मे रोजी सुरेश काळे यांचा मृत्यू झाला.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यात आला. तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनेश दत्ताराम चाळके (45), रा. सुकीवली, खेड याला ताब्यात घेण्यात आले.  त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजार करण्यात आले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.