
सामना ऑनलाईन, पिंपरी
मोबाईल टॉवरच्या चोरीच्या बॅटरी विकत घेत असल्याच्या संशयावरून भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांना बेदम चोपण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-1 कार्यालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक फौजदार रमेश नाळे, कर्मचारी केदारी आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर बाब ही आहे की एका कर्मचाऱ्याला विजेचा शॉक देऊन दुकान मालकाडून साडेआठ लाख रुपये उकळल्याचा आरोप या पोलीस कर्मचाऱ्यांवर लावण्यात आला आहे.
इस्तियाक उर्फ मुस्ताक मलहू खान (३०, रा. कोंढवा) यांनी पिंपरी पोलिसांत छळाची तक्रार नोंदवली आहे. 20 नोव्हेंबरच्या रात्री भंगार दुकानातील कामगार सुमित यादव, अब्दुल खान, सर्वेश गौतम, मोहम्मद खान, अब्दुल करीम खान, वसीम खान, अनूकुमार खान या सर्वांना चौकशीसाठी गुन्हे शाखा युनिट-1 एकच्या कार्यालायत आणले होते. यावेळी तपासाच्या नावाखाली नाळे, केदारी आणि त्यांच्या साथीदारांनी ताब्यात घेतलेल्यांना बेदम मारहाण केली आणि एकाला विजेचा शॉकही दिला. या सगळ्यांविरोधात गुन्हा न नोंदवण्यासाठी 10 लाखांची मागणी करण्यात आली होती. त़डजोडीअंती साडेआठ लाख रूपये या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं तक्रारीत म्हटलंय. या प्रकाराची पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची खातरजमा केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

































































