
देशात एकाचवेळी दोन चक्रीवादळांचा धोका निर्माण झाला होता. अरबी समुद्रात ‘तेज’ आणि बंगालच्या उपसागरात ‘हामुन’ अशा दोन चक्रीवादळांचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात बांगलादेशजवळ सक्रिय असलेले चक्रीवादळ ‘हामून’ आता धोकादायक बनले आहे. त्याच्या प्रभावामुळे देशातील पाच राज्यांमध्ये आगामी 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे.
त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या राज्यातील जनतेला हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुधवारी दुपारी या चक्रीवादळाने चितगावच्या दक्षिणेला बांगलादेशचा किनारा ओलांडला होता. त्याचा वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किमी आहे. सध्या हे वादळ कमकुवत होत कमी दबात रूपांतरित झाले आहे.
हे वादळ गुरुवारी आणखी कमकुवत होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच आणखी एक वादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरावर समुद्रसपाटीपासून 1.5 ते 3.1 किमी उंचीवर असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्याच्या प्रभावाने गेल्या 24 तासात लक्षद्वीप, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये हलका पावसाच्या सरी कोसळल्या.
























































