
देशातून मान्सून एक्झिट घेत असतानाच उद्या मंगळवारी देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ‘सितरंग’ चक्रीवादळ धडकणार आहे. याचा फटका पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, नागालँड या सात राज्यांना बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पश्चिम बंगालच्या उत्तर आणि दक्षिण परगणा, पूर्व मिदनापूरला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार असला तरी सर्व सातही राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, या वादळामुळे आज आसामच्या काही भागांत पाऊस झाला आहे. सध्या सितरंग वादळाचा केंद्रबिंदू पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेला 520 किलोमीटर तर बांगलादेशपासून 670 किलोमीटर समुद्रात होता.
मंगळवारी ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार
पश्चिम बंगालच्या उत्तर आणि दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मिदनापूर जिह्यात ताशी 40-50 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. उद्या वाऱ्याचा वेग ताशी 90-100 किलोमीटर एवढा असू शकतो, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ शकते, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
























































