नव्या पर्जन्यवाहिनीमुळे डी. एन. म्हात्रे रस्त्यावरील पाण्याचा झटपट निचरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवली (पश्चिम) मधील डी. एन. म्हात्रे रस्त्यावर पावसाळय़ामध्ये साचणाऱ्या पाण्याची समस्या मुंबई महापालिकेने कायमस्वरूपी सोडवली आहे. महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने या रस्त्याला लागून सुमारे 465 मीटर अंतराची नवीन पर्जन्य जलवाहिनी बांधल्यामुळे नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात या परिसरातील पाण्याचा झटपट निचरा झाला. त्यामुळे म्हात्रे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे अतिवृष्टीमुळे झाली तर अनेक सखल भागात पाणी साचते. अशावेळी समुद्राला भरती असेल तर पाणी साचण्याच्या कालावधीत वाढ होते. आर-मध्य विभागातील बोरिवली (पश्चिम) येथील डी. एन. म्हात्रे रस्त्याच्या परिसर सखल असल्याने येथे अतिवृष्टीवेळी पाणी साचून रहिवाशांना आणि वाहनचालकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. एक्सार गुरुकृपा सोसायटीजवळ बशीच्या आकाराचा भाग असल्याने आणि एक्सार महापालिका शाळेजवळ पर्जन्य जलवाहिन्यांना अडथळा असल्याने पावसाळी पाण्याचा निचरा लवकर होत नव्हता. त्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने म्हात्रे रस्त्याला लागून देवीदास मार्गावरील ओम शांती चौक ते एक्सार रस्त्यावरील लहान नाल्यापर्यंत चौकोनी आकाराची नवीन पर्जन्य जलवाहिनी बांधली. जुनी 0.6 मीटर आकाराची पर्जन्य जलवाहिनी बदलून नवीन 1.5 चौरस मीटर आकाराची व सुमारे 465 मीटर लांबीची नवीन पर्जन्य जलवाहिनी बांधली आहे.

306 ठिकाणे झाली पूरमुक्त 

मुंबईत पाणी साचण्याची संभाव्य अशी सुमारे 386 ठिकाणे होती. त्यापैकी तब्बल 282 ठिकाणांवर पाण्याचा निचरा करणाऱ्या उपाययोजना प्रशासनाने या आधीच केल्या आहेत. उर्वरित 104 पैकी यंदा 31 मे 2022 पूर्वी आणखी 24 ठिकाणांची कामे पूर्ण केली आहेत. आतापर्यंत मुंबईतील एकूण 306 ठिकाणे पूरमुक्त झाली आहेत. उर्वरित 80 ठिकाणांवरची कामेदेखील 2023 च्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने कार्यवाही सुरू आहे.