दादर महाआरती प्रकरण – विनायक राऊत, मिलिंद वैद्य यांच्यासह सर्व शिवसैनिक दोषमुक्त; दंडाधिकारी न्यायालयाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर येथील हनुमान मंदिर वाचवण्यासाठी २०११ मध्ये शिवसेनेने महाआरतीचे आयोजन केले होते. त्यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून दाखल केलेल्या खटल्यातून दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत, माजी महापौर मिलिंद वैद्य, मनोहर (छोटू) सावंत आणि सिद्धार्थ चव्हाण यांची निर्दोष मुक्तता केली. दादर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अ. अ. मेहेंदळे यांनी हा निकाल दिला.

मुंबई महापालिका प्रशासनाने हनुमान मंदिर तोडण्याची नोटीस बजावली होती. त्या नोटिशीच्या निषेधार्थ शिवसेनेने महाआरतीचे आयोजन केले होते. ८ मार्च २०११ रोजी रात्री आठच्या सुमारास ही महाआरती झाली. या महाआरतीसाठी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले होते. त्यामुळे जमावबंदीचे उल्लंघन आणि वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात शिवसैनिकांच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल पार्टे यांनी भक्कम बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादाची न्यायालयाने गंभीर दखल घेत निकाल दिला. हा खटला १३ वर्षे जुना आहे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जुनी प्रकरणे अत्यंत शीघ्र गतीने निकाली काढणे आवश्यक आहे. परंतु, या खटल्यात १३ वर्षांत कोणतीही प्रगती झाली नाही. अशा स्थितीत खटला बंद करणे योग्य ठरेल, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने विनायक राऊत, मिलिंद वैद्य यांच्यासह सर्व शिवसैनिकांना दोषमुक्त केले.