
सामना प्रतिनिधी, मुंबई
दादर-माहीम चौपाटीला आता नवीन लूक मिळणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱया या चौपाटीच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
वरळी ते माहीम चौपाटी या सुमारे पाच कि.मी.च्या समुद्रकिनाऱयाला नवा लूक देणाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा ज्ञानेश्वर उद्यान ते पांडुरंग नाईक मार्ग हा आहे. सुमारे 4.72 कोटी रुपये खर्च करून या पहिल्या टप्प्यात सौंदर्यीकरण केले जाणार आहे. यामध्ये 20 फूट लांबीचा पदपथ, सोलार पॅनल बसविलेल्या शेडस्, दादर चौपाटीचा इतिहास सांगणारी भित्तीचित्रे, लॅण्डस्केप गार्डन्स, ह्यूइंग गॅलरी अशा अनेक सोयी यात असणार आहेत. दीड वर्षांच्या कालावधीत हा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे.
त्यानंतर पुढील टप्प्यांत संपूर्ण पाच कि.मी.च्या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी, विभागप्रमुख-आमदार सदा सरवणकर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेवक समाधान सरवणकर, उर्मिला पांचाळ, मिलिंद वैद्य, प्रीती पाटणकर, शीतल गंभीर, भाजप माहीम विधानसभा अध्यक्ष विलास आंबेकर, वास्तुरचनाकार शशांक मेहंदळे उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय लॅण्डमार्क होणार
दादर चौपाटीला होणाऱया नव्या ह्यूइंग गॅलरीमधून समोर सी लिंक दिसतो. या सी लिंकवर दरवर्षी थर्टी फर्स्टला आतषबाजी आणि लेझर शो करण्यात येईल. ही आतषबाजी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नवे लॅण्डमार्क होईल, अशी घोषणा खासदार शेवाळे यांनी केली.




























































