
सामना प्रतिनिधी, मुंबई
अंधेरी डीएन नगर आणि दहिसरच्या मेट्रोची चाचणी पुढील वर्षी होणार आहे. त्यानंतर दर तीन महिन्यांनी 12 गाडय़ा मुंबईत दाखल होतील. या मेट्रोसाठी 378 डबे लागणार असून त्याचे 3 हजार कोटींचे कंत्राट नुकतेच देण्यात आले.
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणांशी सुसंगत मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचे काम देशातच होणार आहे. या कामासाठी ‘भारत अर्थ मुव्हर्स’ या कंपनीला जपानच्या ‘हिताची’ कंपनीतर्फे तांत्रिक सहाय्य मिळणार आहे. हे डबे प्रति कोच 7.98 कोटी रुपयांत तयार केले जाणार असून त्यामुळे एमएमआरडीएची 1100 कोटी रुपयांची बचत होणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने यासाठी उभयपक्षी सहकार्याच्या आधारावर अर्थसहाय्य केले आहे.
रुळांवर अडथळा आल्यास दूर करणारी यंत्रणा
मेट्रोचे हे डबे देशात उपलब्ध असणाऱया अत्याधुनिक निकषांनुसार तयार होणार असून ते 3.2 मीटर रुंदीचे, 25 कि.वॅ.क्षमतेच्या विद्युत प्रणालीवर स्टॅण्डर्ड गेजवर कार्यरत होणार आहेत. सुरुवातीला ‘अनअटेंडट ट्रेन ऑपरेशन’ पद्धतीने मेट्रो गाडय़ा धावणार असून ‘कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल’ (सीबीटीसी) तंत्रामुळे दोन गाडय़ांच्या फेऱयांमध्ये केवळ 90 सेकंदांचे अंतर राखले जाणार आहे. रुळांवर काही अडथळा आल्यास तो दूर करणारी यंत्रणाही यात अंतर्भूत आहे.
दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो क्र.2 अ, डी. एन. नगर ते मंडाळे-मानखुर्द मेट्रो क्र.2-ब, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो क्र. 7 साठी मेट्रोचे 378 डबे पुरविण्याचे 3015 कोटींचे कंत्राट ‘भारत अर्थ मुव्हर्स’ या कंपनीला देण्यात आले आहे.
मेट्रो-2 आणि 7 मार्गिकेवर पुढच्या वर्षी चाचणी करण्यासाठी सर्व सुखसोयींनी युक्त अशा पहिल्या काही गाडय़ा उपलब्ध होणार असून यशस्वी चाचणीनंतर दर तीन महिन्यांनी 12 गाडय़ा याप्रमाणे 200 आठवडय़ांत पुढील गाडय़ांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअरप्रणाली
अत्यंत अत्याधुनिक असलेले हे डबे वजनाने हलके असणार असून संपूर्ण वातानुकूलित असणार आहेत. ‘चालकविरहित प्रणाली’वर चालणाऱया या गाडय़ा असल्या तरी प्रारंभी त्या चालकांमार्फतच चालविल्या जाणार आहेत. कार्बनविरहित -ऊर्जानिर्मितीक्षम ब्रेक सिस्टम, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर, आग नियंत्रण यंत्रणा इत्यादी बाबींचा यात समावेश असणार आहे.



























































